राहुरी,वेब प्रतिनिधी,२१ (शरद पाचारणे ): पुणे येथून आपल्या गावी परतणाऱ्या एका युवतीच्या प्रसंगावधानामुळे एका निष्पाप वासराचे प्राण वाचले. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात घडलेल्या या घटनेत, युवतीने दाखवलेल्या माणुसकीला पोलीस प्रशासनाचीही साथ मिळाली.
दिनांक २० मे २०२५ रोजी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास, निर्मळ पिंपरी, ता. राहता, जि. अहिल्यानगर येथील २५ वर्षीय ऋतुजा कैलास कांबळे या पुणे येथून ताहाराबाद मार्गे कानडगावकडे जात होत्या. ताहाराबाद ते कानडगाव दरम्यानच्या घाटातील जंगलात त्यांना काटेरी झुडपात एक मरणासन्न अवस्थेतील गिर गाईचे दोन-तीन दिवसांचे वासरू दिसले. कुणीतरी त्याला सोडून दिल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
ऋतुजाने तात्काळ ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या मदतीने त्या वासराला बाहेर काढले आणि पाणी पाजले. आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे वासराला सांभाळण्याची विनंती केली असता, त्यांनी नकार दिला. वासराचे काय करावे या विवंचनेत असतानाच, त्याचवेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि त्यांच्या पत्नी सौ. जया संजय ठेंगे तेथून जात होत्या. ऋतुजाने आपल्या दुचाकीवर ठेवलेल्या वासराविषयी विचारणा केली असता, तिने घडलेला प्रसंग त्यांना सांगितला आणि वासराला कुठल्यातरी गोशाळेत सोडण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली.
वासराचे वय पाहता ते चारा खात नव्हते, त्यामुळे जोपर्यंत चारा खाण्यास सुरुवात करत नाही तोपर्यंत त्याला गोशाळेत घेतले जात नाही हे समजले. यावर पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी माणुसकी दाखवत वासराला राहुरी पोलीस स्टेशन येथे आणले. त्यांनी ठाणे अंमलदार बबन राठोड यांना कल्पना दिली आणि ज्याचे कुणाचे हे वासरू असेल त्याने ते घेऊन जावे असे आवाहन केले. तसेच, वासरू चारा खाण्यास सुरुवात करेपर्यंत त्याची काळजी घेण्याची तयारी दर्शवली.
यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारे लहान वासरे धोकादायक स्थितीत सोडू नये. जर वासरांचा सांभाळ करणे शक्य नसेल, तर परिसरातील गोशाळांशी संपर्क साधून त्यांना वासरू सांभाळण्यासाठी द्यावे. ऋतुजा कांबळे यांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.