जादा परताव्याच्या आमिषाने फसवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करा – आमदार विक्रम पाचपुते

अहिल्यानगर वेब टिम : राज्यात अधिक परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार विक्रम पाचपुते यांनी केली आहे. सिस्पे इन्फिनाईट (Syspe Infinite), बिकॉन (Beacon), आय.बी. ग्लोबल (I.B. Global), झेस्ट (Zest), आणि एएमसी (AMC) यांसारख्या अनेक कंपन्यांनी शेकडो कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत आमदार पाचपुते यांनी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर, त्यांनी अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेतली. यावेळी पाचपुते यांनी एका निवेदनाद्वारे या फसव्या कंपन्यांवर तात्काळ व कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे कि काही कंपन्यांनी शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करून अधिक परतावा देण्याच्या नावाखाली अनेक निष्पाप नागरिकांना शेकडो कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. सुरुवातीला १०% ते १५% प्रति महिना परतावा देण्याचे आमिष दाखवून, नंतर गुंतवणूकदारांचे पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. या कंपन्यांनी श्रीगोंदा-अहिल्यानगर मतदारसंघातील नागरिकांसह राज्यातील अनेक लोकांना फसवल्याचे पाचपुते यांनी नमूद केले.
गुंतवणूकदारांच्या मदतीला आमदार पाचपुते धावले असल्याने अनेकांनी त्याचे आभार मानले आहे . 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *