आंतरराष्ट्रीय स्तरावर भूमीपुत्रांनी मिळवलेले यश जिल्ह्यासाठी गौरवपूर्ण – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर, दि. २३ (शरद पाचारणे ) –

 आंतरराष्ट्रीय स्तरावर भूमीपुत्रांनी  क्रिडा क्षेत्रात  मिळवलेले यश अहील्यानगर जिल्ह्याकरीता गौरवपूर्ण असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. जिल्ह्यातील चार खेळाडूंना जिल्हाधिकारी कार्यालयात गौरविण्यात आले.

क्रीडा व युवक संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंमध्ये धनश्री हनुमंत फंड हिने २० वर्षांखालील एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप, बर्लिन २०२४ मध्ये सुवर्णपदक पटकावले असून ती २० वर्षांखालील वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप, बल्गेरियासाठी निवडली गेली आहे. सुजय नागनाथ तनपुरे याने व्हिएतनाम येथे झालेल्या आशियाई बीच रेसलिंग कुस्ती स्पर्धेत ७० किलो वजनगटात सुवर्णपदक पटकावले असून ग्रीस येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.

शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या (२०१९-२०) श्रीमती प्रणिता सोमण हिने एप्रिल २०२५ मध्ये चीन येथे झालेल्या एम.टी.बी. एशियन चॅम्पियनशिप मिक्स टीम रिले स्पर्धेत कांस्यपदक पटकावले असून ती आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तयारी करत आहे. वेदांत नितीन वाघमारे याने पेरू येथे झालेल्या ज्युनियर वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवले असून तो कझाकिस्तान येथे होणाऱ्या एशियन शूटिंग चॅम्पियनशिपसाठी निवडला गेला आहे.

जिल्ह्याच्या क्रीडा परंपरेला उजाळा देणाऱ्या या खेळाडूंनी जागतिक स्तरावर आणखी यश संपादन करावे, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *