अहिल्यानगर विशेष प्रतिनिधी,२३ (शरद पाचारणे ):
प्रवरा सहकारी बँकेने सहकार क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठत विळदघाट येथे आपली नवीन शाखा सुरू केली आहे. जलसंपदा आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या नवीन शाखेचे उद्घाटन केले. ही शाखा अहिल्यानगरच्या औद्योगिक आणि व्यावसायिक प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या उद्घाटन समारंभाला सौ. शालिनी विखे पाटील, माजी आमदार नंदकुमार झावरे, वसंतराव कापरे, बँकेचे चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे, व्हा.चेअरमन मच्छिंद्र थेटे, सीईओ सौरभ बालोटे, संचालक मंडळ, पद्मश्री डॉ. विखे पाटील फाऊंडेशनचे संचालक डॉ. अभिजीत दिवटे आणि डॉ. पांडुरंग पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पन्नास वर्षांची यशस्वी वाटचाल
मंत्री विखे पाटील म्हणाले की, लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी दूरदृष्टीने या बँकेची स्थापना केली. बँकेने समाजातील छोट्या वर्गाला विविध कर्ज योजनांच्या माध्यमातून मदत केली आहे. आज सभासद, ठेवीदार आणि चांगल्या कर्जदारांच्या सहकार्याने बँकेने पन्नास वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली असून, सुमारे १४०० कोटी रुपयांचा व्यवसाय टप्पा गाठला आहे.
विळदघाट येथील ही नवीन शाखा अहिल्यानगर जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक आणि छोट्या व्यावसायिकांसाठी एक मोठा आधार ठरेल. नागापूर औद्योगिक वसाहतीजवळ असल्यामुळे उद्योजकांना आर्थिक व्यवहारांसाठी एक विश्वासार्ह ठिकाण मिळाले आहे, असेही विखे पाटील यांनी सांगितले.
यावेळी, वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी प्रवरा बँक लवकरच ग्राहक आणि उद्योजकांसाठी संवाद कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. कार्यक्रमाचे स्वागत बँकेचे चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे यांनी केले.