राहुरी वेब प्रतिनिधी,२३ (शरद पाचारणे ) : राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे मावस भावाला शिवीगाळ करत असताना त्याला सोडवण्यासाठी गेलेल्या एका 25 वर्षीय तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दादा भाऊसाहेब बर्डे (वय 25, रा. ताहराबाद, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवार, 22 जुलै 2025 रोजी रात्री आठच्या सुमारास त्यांच्या घराजवळील मारुती मंदिरासमोर त्यांचा मावस भाऊ शुभम नाना पवार याला राहुल गोकुळ मोरे (रा. सोनगाव, ता. राहुरी) शिवीगाळ करत होता. शुभमला सोडवण्यासाठी दादा बर्डे गेला असता, राहुल मोरेने “तू इथे कसा आलास” असे म्हणत त्यालाही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर राहुलने त्याच्या हातातील लाकडी दांड्याने दादा बर्डेच्या उजव्या हातावर मारहाण केली.
या भांडणात दादा बर्डे यांचे मामा भारत बाबासाहेब पैसे हा भांडण सोडवण्यासाठी आला असता, रोहिदास मोरे (पूर्ण नाव माहित नाही, रा. टाकळीमिया, ता. राहुरी) याने एक दगड उचलून भारत पैसे यांच्या दिशेने फेकला. तो दगड त्यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली लागल्याने तेही जखमी झाले.
या घटनेनंतर दादा बर्डे यांनी राहुल गोकुळ मोरे आणि रोहिदास मोरे यांच्या विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिस करत आहेत.