अहिल्यानगर,२२ वेब टिम : अहिल्यानगर पोलिस मुख्यालयातील घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे ८ लाख ७६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनंदा नरहरी ढाकणे यांच्या राहत्या घरातील पाठीमागील दरवाजाची कडी उघडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला होता. चोरट्याने घरातील लोखंडी कपाटातून ६८ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. ही घटना १७ जुलै २०२५ रोजी घडली होती आणि सुनंदा ढाकणे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच, तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवली. त्यांनी पोलिस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांना गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले. उपनिरीक्षक योगेश चाहेर यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि गोपनीय माहितीदारांकडून माहिती गोळा केली.
या माहितीच्या आधारे, प्रकाश उर्फ मारी रावसाहेब उमाप (वय २४, रा. भोसले किरण दुकानाजवळ, सिद्धार्थनगर, अहिल्यानगर) याने चोरीचे दागिने घेतल्याचे समजले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच, चोरलेले दागिने त्याने त्याचा मित्र दुर्गेश चंद्रकांत चिंतामणी (वय २१, रा. नेप्ती नाका, अमरधामच्या पाठीमागे, अहिल्यानगर) याच्याकडे दिल्याचे सांगितले.
पोलिसांनी तात्काळ दुर्गेशला अटक केली. त्याच्याकडून ६ लाख ८० हजार रुपये किमतीच्या ७० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या, ५४ हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दोन टॉप्स, ३६ हजार रुपये किमतीच्या चार ग्रॅम वजनाच्या चार लहान अंगठ्या जप्त करण्यात आल्या. याशिवाय, दुसऱ्या एका गुन्ह्यातील ४० हजार रुपये किमतीचे साडेचार ग्रॅम वजनाचे कानातील दोन झुबे, ३१ हजार रुपये किमतीचे साडेतीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण, ३१ हजार रुपये किमतीचे साडेतीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले, आणि चार हजार रुपये किमतीची एक चांदीची चैन असा एकूण ९२ ग्रॅम वजनाचा सोन्या-चांदीचा दागिना, ज्याची एकूण किंमत ८ लाख ७६ हजार रुपये आहे, तो मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक अहिल्यानगर श्री वैभव कलुबर्मे, आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती (नगर शहर विभाग, अहिल्यानगर) यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कामगिरीमध्ये तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री आनंद कोकरे, पोलिस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलिस हेडकॉन्स्टेबल योगेश चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल अविनाश बर्डे, पोलिस कॉन्स्टेबल सतीश त्रिभुवन, पोलिस कॉन्स्टेबल सतीश भवर, पोलिस कॉन्स्टेबल भागवत बांगर तसेच मोबाईल सेलचे पोलिस कॉन्स्टेबल राहुल गुण्डु यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.