तोफखाना पोलिसांची मोठी कारवाई: टॅब आणि स्मार्ट वॉच चोरणारी महिला जेरबंद ,६० हजारांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर वेब टिम :- तोफखाना पोलिसांनी एका महिलेला सॅमसंग कंपनीचा टॅब आणि स्मार्ट वॉच चोरल्याप्रकरणी अटक केली असून, तिच्याकडून सुमारे ६०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

महेशकुमार बन्सीलाल चांडक (वय ५७, रा. रासनेनगर, सावेडी, अहिल्यानगर) यांनी २० जुलै २०२५ रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, त्यांचा मुलगा अथर्व १७ जुलै रोजी बंगळूरुहून सुट्टीसाठी घरी आला होता. १९ जुलै रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्याला त्याचा ४०,००० रुपये किमतीचा सॅमसंग टॅब आणि २०,००० रुपये किमतीचे सॅमसंग स्मार्ट वॉच घरात सापडले नाही. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ नुसार गुन्हा (गु.र.नं. ७६७/२०२५) दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या सूचनेनुसार, पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली आणि गोपनीय माहितीदारांमार्फत तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, अंजली कुलकर्णी (रा. सिद्धार्थनगर) हिने हा गुन्हा केल्याचे समोर आले.

पोलिस उपनिरीक्षक योगेश चाहेर, महिला पोलीस नाईक जिजा खुडे, पोलीस कॉन्स्टेबल सुजय हिवाळे आणि सतीश त्रिभुवन यांनी अंजली सुनील कुलकर्णी (वय ४३, रा. म्युन्सिपल कॉलनी, अहिल्यानगर ) हिला तिच्या सिद्धार्थनगर येथील पत्त्यावर जाऊन ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने गुन्हा कबूल केला आणि चोरलेला ४०,००० रुपयांचा सॅमसंग टॅब आणि २०,००० रुपयांचे सॅमसंग स्मार्ट वॉच असे एकूण ६०,००० रुपयांचे साहित्य पोलिसांसमोर हजर केले, जे जप्त करण्यात आले आहे.

ही कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे आणि नगर शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, म.पो.ना जिजा खुडे, पो.कॉ. सतीश त्रिभुवन आणि पो.कॉ. सुजय हिवाळे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *