राहुरी वेब प्रतिनिधी,२० ( शरद पाचारणे ):- विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्र आणि आकाश निरीक्षणाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाने एक दुर्बीण खरेदी केली आहे. या दुर्बिणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अवकाश निरीक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे, ज्यामुळे त्यांची जिज्ञासा आणि संशोधक वृत्ती वाढीस लागेल.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाने, मुख्याध्यापक अरुण तुपविहिरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित केला. अहिल्यानगर येथील व्हर्स्टाटाइल ग्रुपचे खगोलशास्त्र अभ्यासक अनिरुद्ध बोपर्डीकर, अमोल सांगळे आणि सुभाष पाडगावकर यांनी दुर्बिणीची जोडणी करून दिली. तसेच, आकाश निरीक्षण करताना दुर्बिणीचा वापर कसा करावा, याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
डॉ. नानासाहेब पवार सभागृह, कृषी विद्यापीठ राहुरी येथे कृषी विद्यापीठातील सुमारे ९०० विद्यार्थ्यांसाठी “आकाशाची दुनिया, दुर्बिणीच्या नजरेतून” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात खगोल अभ्यासक अनिरुद्ध बोपर्डीकर, अमोल सांगळे आणि सुभाष पाडगावकर यांनी विद्यार्थ्यांना खगोलीय घटना, गुरुत्वाकर्षण, नक्षत्र आणि आकाश निरीक्षण याबद्दल अत्यंत मनोरंजक पद्धतीने माहिती दिली. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाविषयी आवड आणि कुतूहल निर्माण झाले, ज्यामुळे त्यांची विवेकबुद्धी जागृत होण्यास मदत होईल.
या उपक्रमाबद्दल सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे सभापती डॉ. प्रमोद रसाळ, सचिव डॉ. महानंद माने आणि खजिनदार महेश घाडगे यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जितेंद्र मेटकर यांनी केले, सूत्रसंचालन हलीम शेख यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक अरुण तुपविहिरे यांनी मानले.
याप्रसंगी पर्यवेक्षक मनोज बावा, घनश्याम सानप, सचिन सिन्नरकर, रवींद्र हरिश्चंद्रे, ज्ञानदेव देवकर, संतोष जाधव, तुकाराम जाधव, सुरेखा आढाव, अनघा सासवडकर, सपना तुवर या शिक्षकवर्गासह विद्यालयातील कर्मचारी देखील उपस्थित होते. या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये आकाश निरीक्षणाबद्दल मोठी आवड आणि जिज्ञासा निर्माण झाली आहे.