राहुरी वेब प्रतिनिधी,२० (शरद पाचारणे ) :- राहुरी येथील विद्यामंदिर प्रशालेच्या १९९६ च्या दहावी आणि १९९८ च्या बारावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत माणुसकीचा एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. आपुलकी, एकोपा आणि परोपकारी वृत्तीचे दर्शन घडवत, या माजी विद्यार्थ्यांनी पुण्यातील एका आश्रमशाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे.
या उपक्रमाची सुरुवात पुण्यातील माजी विद्यार्थिनी सौ. स्वाती सोलट यांनी केली. त्यांनी आपल्या वर्गमित्रांना यशवंतराव चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा, गुळवेवस्ती, लांडेवाडी, भोसरी येथील विद्यार्थ्यांच्या गरजांबद्दल माहिती दिली. शाळेतील मुलांना गाद्या, ब्लँकेट्स आणि इतर आवश्यक वस्तूंची गरज असल्याचे त्यांनी एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर साधेपणाने शेअर केले.
सौ. सोलट यांच्या या संवेदनशील आवाहनाला माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. १८ मे २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या गेट-टुगेदरच्या आठवणींनी सर्वजण भावनिकदृष्ट्या जोडले गेले. विशेष म्हणजे, अवघ्या एका आठवड्यात, कोणतीही सक्ती नसताना, तब्बल रु. ३१,१६५/- इतकी देणगी स्वेच्छेने जमा झाली. ही रक्कम सौ. सोलट यांच्या खात्यात ऑनलाइन स्वरूपात जमा करण्यात आली.
या निधीतून आश्रमशाळेसाठी २५ गाद्या आणि २५ बेडशीट्स खरेदी करण्यात आल्या आणि त्या गरजू विद्यार्थ्यांच्या सेवेत अर्पण करण्यात आल्या. या सामाजिक उपक्रमातून माजी विद्यार्थ्यांनी केवळ आर्थिक मदतच केली नाही, तर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत त्यांच्या आयुष्यात उबदारपणा आणला आहे.
हा उपक्रम “माणुसकी अजूनही जिवंत आहे आणि जुनी मैत्री आजही हृदयात नांदते” या सकारात्मक संदेशाची प्रचिती देतो. विद्यामंदिर प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी समाजाप्रती आपली बांधिलकी आणि परोपकाराची भावना यातून सिद्ध केली आहे.