राहुरी वेब प्रतिनिधी,२५ जुलै (शरद पाचारणे ) – श्रीरामपूर उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या एका आरोपीला राहुरी पोलिसांनी ताहाराबाद यात्रेतून ताब्यात घेतले आहे. अविनाश भिकन विधाते (वय 26, रा. ताहाराबाद) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला पुढील कारवाईसाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमधील चिकलठाणा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश विधातेला 8 नोव्हेंबर 2024 पासून पुढील एक वर्षासाठी संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर, नाशिक जिल्ह्यातील येवला आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर या लगतच्या तालुक्यांमधून हद्दपार करण्यात आले होते.
राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना अविनाश विधाते ताहाराबाद यात्रेत येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ पोलीस पथकाला आरोपीचा शोध घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, 24 जुलै 2025 रोजी आरोपी यात्रेत आढळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले.
राहुरी पोलीस स्टेशनमध्ये अविनाश विधाते विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 नुसार गुन्हा (गुरनं- 815/2025) दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिकलठाणा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.