छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबना प्रकरणातील आरोपींना अटक करा, अन्यथा समाजात अशांतता निर्माण होईल – देवेंद्र लांबे पा.

राहुरी वेब प्रतिनिधी, २० (शरद पाचारणे): राहुरी शहरात बुधवार, २६ मार्च २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला काळे फासून विटंबना करण्यात आली होती. या घटनेला चार महिने उलटूनही आरोपींना अद्याप अटक न झाल्याने समाजात तीव्र रोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष तथा मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे पाटील यांनी नितीन पटारे, प्रवीण देवकर आणि महेंद्र शेळके यांच्यासह अहिल्यानगर येथील पोलीस मुख्यालयी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी देवेंद्र लांबे पाटील यांनी तीव्र शब्दांत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना होण्याची घटना आजपर्यंत महाराष्ट्रातच काय, तर संपूर्ण भारतात घडलेली नाही. अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपतींच्या मूर्तीची विटंबना होऊनही आरोपीला अटक न झाल्याने शिवशंभू प्रेमींच्या मनात प्रचंड प्रमाणात रोष निर्माण होत आहे.”

लांबे पाटील यांनी पोलीस प्रशासनाला इशारा दिला की, जर या प्रकरणातील आरोपींवर कायदेशीर कारवाई झाली नाही, तर राहुरी शहरासह तालुक्यात सामाजिक तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या घटनेचे पडसाद अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात उमटू शकतात, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

“छत्रपतींच्या भूमीत छत्रपतींच्या मूर्तीची विटंबना करणारा आरोपी सापडत नसेल, तर हे संपूर्ण महाराष्ट्रातील छत्रपती शिवशंभू प्रेमींसाठी अत्यंत खेदजनक आहे,” असे ते म्हणाले. या प्रकरणातील आरोपींना अटक करून कठोर शासन होणे गरजेचे आहे, कारण संबंधित आरोपींवर कारवाई न झाल्यास भविष्यात अशा नीच प्रवृत्ती असणाऱ्यांचे मनोबल वाढेल. यामुळे असे लोक भविष्यात कोणतीही समाजविघातक घटना घडवण्यासाठी मागे-पुढे पाहणार नाहीत, ज्यामुळे सामाजिक तेढ आणि अशांतता निर्माण होऊ शकते, असेही लांबे पाटील यांनी नमूद केले.

“छत्रपतींच्या मूर्तीची विटंबना म्हणजे छत्रपतींच्या विचारांवर काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा अपमान आहे,” असे सांगत देवेंद्र लांबे पाटील यांनी मराठा एकीकरण समितीच्या वतीने संबंधित घटनेतील दोषींना शोधून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *