राहुरी वेब प्रतिनिधी,१५ जुलै (शरद पाचारणे ):- राहुरी बस स्थानकावर मंगळवार, ८ जुलै २०२५ रोजी दुपारी एका अंगणवाडी सेविकेची सुमारे ३७ ग्रॅम सोन्याचे दागिने असलेली पर्स अज्ञात भामट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत श्रीरामपूर येथील मंगल दिलीप गवळी (रा. मोरगे वस्ती, वॉर्ड क्रमांक ३, श्रीरामपूर) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार, मंगल गवळी या ८ जुलै रोजी सकाळी ९ वाजता पुणे येथून पुणे-शिर्डी बसमध्ये श्रीरामपूरला जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांनी राहुरीचे तिकीट काढले आणि दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्या राहुरी बस स्थानकावर उतरल्या.
दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर -श्रीरामपूर बस राहुरी स्थानकावर आली. बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने मंगल गवळी यांच्या पर्समधील सोन्याच्या दागिन्यांचे छोटे पाकीट लंपास केले. बसमध्ये चढून सीटवर बसल्यानंतर तिकीट काढण्यासाठी त्यांनी पर्स उघडली असता, पर्सची चेन उघडी दिसली. त्यांना शंका आल्याने त्यांनी पर्स तपासली असता, त्यात ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांचे पाकीट गायब असल्याचे आढळले.
चोरी झालेल्या दागिन्यांमध्ये दीड तोळ्याचे सोन्याचे लॉकेट (त्यात सोन्याचे ओम पान असलेले), दोन तोळ्याची चैन आणि दोन ग्रॅमची सोन्याची अंगठी असा एकूण ३७ ग्रॅम वजनाचा (जु.वा.कि.अं .)सुमारे ६५ हजार रुपये किमतीचा ऐवज होता.
याप्रकरणी मंगल दिलीप गवळी यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करत आहेत. बस स्थानकावर वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे प्रवाशांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.