राहुरी वेब प्रतिनिधी,१२ (शरद पाचारणे ): घराचे उर्वरित बांधकाम पूर्ण करण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करत विवाहितेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून घराबाहेर काढल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १२ नोव्हेंबर २०२४ रोजी घडली असून, पीडित विवाहितेने ११ जुलै २०२५ रोजी फिर्याद दिली आहे.
बारागाव नांदूर येथील २७ वर्षीय निशाद आरिफ शेख (रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे लग्न २०१७ मध्ये बारागाव नांदूर येथील आरिफ शेख यांच्यासोबत झाले होते. लग्नानंतर दीड वर्षांनी सासरे वजीर अब्दुल शेख आणि सासू अफसाना वजीर शेख यांनी निशाद यांच्याकडे घराच्या बांधकामासाठी माहेरहून ३ लाख रुपये आणण्याची मागणी केली. निशाद यांनी पती आरिफला याबाबत सांगितले असता, त्यानेही पैशांची मागणी केली. निशाद यांनी आपल्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती नसल्याचे सांगितले असता, आरिफने त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली.
या घटनेनंतर पती आरिफ वजीर शेख, सासरे वजीर अब्दुल शेख आणि सासू अफसाना वजीर शेख यांनी निशाद यांचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. या त्रासाला कंटाळून २०२२ मध्ये निशाद माहेरी मानोरी येथे आपल्या आई-वडिलांकडे गेल्या. त्यांनी घडलेला प्रकार सांगितल्यावर, वडिलांनी पैसे जमवून ३ लाख रुपये सासरच्या मंडळींना दिले आणि मुलीला त्रास न देण्याची विनंती केली. त्यानंतर सहा महिने सासरच्या लोकांनी निशाद यांना चांगली वागणूक दिली.
मात्र, घराचे उर्वरित बांधकाम पूर्ण करण्यासाठी पुन्हा ५ लाख रुपयांची मागणी सुरू झाली. एवढे पैसे आई-वडिलांकडे नाहीत आणि यापूर्वीच ३ लाख रुपये दिले आहेत, असे निशाद यांनी सांगितल्यावर त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आली. पती आरिफ वजीर शेख, सासरे वजीर अब्दुल शेख, सासू अफसाना वजीर शेख यांनी त्यांना उपाशीपोटी ठेवून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याच दरम्यान, नणंदा यास्मिन सोनल शेख (रा. राहुरी) आणि आस्मा जावेद शेख (रा. देवळाली बिरोबावाडी, ता. राहुरी) यांनीही घरी आल्यावर, “तू तुझ्या वडिलांकडून पैसे का आणत नाहीस?” असे म्हणून मारहाण करत मानसिक छळ केला.
अखेरीस, १२ नोव्हेंबर २०२४ रोजी पती आरिफ वजीर शेख, सासरे वजीर अब्दुल शेख, सासू अफसाना वजीर शेख, नणंद यास्मिन सोनल शेख आणि आसमा जावेद शेख यांनी निशाद शेख यांना “तू तुझ्या आई-वडिलांकडून घराचे उर्वरित बांधकामासाठी ५ लाख रुपये घेऊन ये, नाहीतर इकडे परत येऊ नकोस,” असे म्हणून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून घराबाहेर काढले.
त्यानंतर निशाद माहेरी आई-वडिलांकडे परतल्या. नातेवाईकांच्या मदतीने त्यांनी सासरच्यांना वेळोवेळी समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी ऐकले नाही. त्यानंतर निशाद यांनी अहिल्यानगर येथील भरोसा सेलमध्ये तक्रार दिली, परंतु सासरच्या मंडळींनी निशाद यांना नांदवण्यास नकार दिला.
या प्रकारानंतर, निशाद शेख यांनी ११ जुलै २०२५ रोजी राहुरी पोलीस ठाण्यात पती आरिफ वजीर शेख, सासरे वजीर अब्दुल शेख, सासू अफसाना वजीर शेख (सर्व रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी), यास्मिन सोनल शेख (रा. राहुरी) आणि आस्मा जावेद शेख (रा. देवळाली बिरोबावाडी, ता. राहुरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राहुरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.