राहुरी वेब प्रतिनिधी ११ जुलै ( शरद पाचारणे) :- अहिल्यानगर जिल्ह्यात हिंदू धर्मियांच्या सक्तीच्या धर्मांतराच्या विरोधात आज सकाळी ११ वाजता हिंदू समाजाच्या वतीने राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांना निवेदन देण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतरण केले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, गरीब हिंदूंच्या भावनांचा गैरफायदा घेऊन, अंधश्रद्धा निर्माण करून, आर्थिक प्रलोभने देऊन आणि रुग्णसेवेच्या नावाखाली हिंदू देवी-देवतांची विटंबना करून मोठ्या प्रमाणावर सक्तीने धर्मांतर केले जात आहे. यामागे एक मोठे रॅकेट कार्यरत असून, त्यासंदर्भात चौकशी करून यात सहभागी असलेले फादर, पास्टर आणि पालक यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सकल हिंदू समाजाच्या वतीने शासनाने लवकरात लवकर धर्मांतर बंदी कायदा लागू करावा आणि सक्तीने होणारे अवैध धर्मांतर थांबवावे अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन देण्यासाठी टाळ-मृदंगाच्या गजरात मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते.
यावेळी ह.भ.प. नवनाथ महाराज म्हस्के, ह.भ.प. सुनील महाराज पवार, ह.भ.प. अशोक महाराज भोसले, ह.भ.प. खाटेकर महाराज, ह.भ.प. पारे महाराज, ह.भ.प. कृष्णा महाराज जिरेकर यांच्यासह अनेक हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.