राहुरी, १५ जुलै (वेब प्रतिनिधी, शरद पाचारणे):- राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि रुग्णांच्या हेळसांडीच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज (दि. १४ जुलै) रुग्णालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयात कुठलीच सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
राहुरी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड सुरूच असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. केवळ रुग्णच नव्हे, तर मृतदेहांचीही विटंबना होत असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला होता. दोन दिवसांपूर्वी शहरातील हॉटेल व्यावसायिक राजेश नगरकर यांनी आत्महत्या केली होती. त्यावेळी रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे त्यांच्या मृतदेहाच्या शवविच्छेदनासाठी तब्बल तीन तास उशीर झाला, ज्यामुळे नगरकर कुटुंबीयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
ही गंभीर बाब प्राजक्त तनपुरे यांना समजताच त्यांनी तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. रुग्णांची होणारी हेळसांड आणि मृतदेहाची विटंबना याबाबत त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. अधिकाऱ्यांनी त्यांच्या अडचणी तनपुरे यांच्यासमोर मांडल्या.
तनपुरे यांनी तात्काळ वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधून आवश्यक त्या सूचना केल्या. तसेच, त्यांनी राहुरी नगरपरिषद कार्यालयातील अधिकाऱ्यांना शवविच्छेदन गृहाच्या परिसरात तातडीने स्वच्छता करण्याचे निर्देश दिले. यावेळी राजेंद्र बोरकर, महेश उदावंत, अर्जुन बुऱ्हाडे आदी उपस्थित होते. तनपुरे यांच्या या अचानक भेटीमुळे रुग्णालयाच्या कारभारात सुधारणा होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.