राहुरी वेब प्रतिनिधी,१८ (शरद पाचारणे ) :-
अमरावती जिल्ह्यातील व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि माजी आमदार बच्चु कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी ‘चक्काजाम’ आंदोलन पुकारण्यात आलं आहे. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून, राहुरी येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने येत्या गुरुवारी, २४ जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनासाठी राहुरी येथील प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिलं आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतीमालाला योग्य भाव आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन मार्केट यार्डसमोर, राहुरी-मनमाड हायवेवर सकाळी ९ ते १० या वेळेत होणार आहे. हे आंदोलन पूर्णपणे शांततेत आणि लोकशाही मार्गाने होईल, असं निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे.
या आंदोलनात शेतकरी, शेतमजूर, कामगार, दिव्यांग आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आंदोलनाला परवानगी मिळावी यासाठी हे निवेदन देण्यात आलं आहे, ज्यावर प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांच्यासह सलीम शेख, योगेश लबडे, रवींद्र भुजाडी, विजय म्हसे, दत्तात्रय खेमनर, सुरेश लांबे, वेनुनाथ आहेर, बाबुराव शिंदे, चंद्रकांत रेबडे, महेश शेलार, रमेश शेलार, जुबेर मुसानी, विजय सूर्यवंशी, संजय देवरे आणि फिरोज मन्सूरी यांच्या सह्या आहेत.