राहुरी वेब प्रतिनिधी,१७ (शरद पाचारणे) – राहुरी शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या राजेंद्र भन्साळी यांच्या वर्धमान ज्वेलर्स या दुकानात सोमवार, १४ जुलै २०२५ रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेमुळे राजेंद्र भन्साळी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, या चोरीचा तपास तातडीने लावण्यात यावा, अशी मागणी राहुरी तालुका सराफ सुवर्णकार संघटनेने केली आहे.
आज, गुरुवार, १७ जुलै २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता, संघटनेच्या वतीने राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर रवींद्र उदावंत, मुकुंद मैड, राहुल उदावंत, सचिन डहाळे, दादासाहेब भडकवाड, मनोज आंबिलवादे, संजीव उदावंत, राजेंद्र उदावंत, दीपक नागरे, विजय बोराडे आणि सौरव भन्साळी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
सराफ संघटनेने पोलीस प्रशासनाकडे या गंभीर गुन्ह्याचा युद्धपातळीवर तपास करून, चोरट्यांना तात्काळ अटक करण्याची आणि चोरीस गेलेला ऐवज परत मिळवून देण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे राहुरी शहरातील व्यापाऱ्यांमध्ये, विशेषतः सराफ व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.