राहुरी वेब प्रतिनधी,१७ (शरद पाचारणे ):- राहुरी तालुक्यातील वांबोरी गावात १९ जून रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या दरोड्याप्रकरणी राहुरी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून लाखोंची रोकड, दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल तसेच हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
१९ जून रोजी पहाटे पाच ते सहा अज्ञात दरोडेखोरांनी वांबोरी येथील तीन ठिकाणी दरोडा टाकून धुमाकूळ घातला होता. या घटनेत दरोडेखोरांनी ८० हजार रुपयांचे दागिने आणि ११ हजार रुपये रोख रक्कम घेऊन पोबारा केला होता, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे सुरू केला. या तपासात त्यांना अजय मिरीलाल काळे (वय २५, रा. मक्तापूर, ता. नेवासा) हा आरोपी निष्पन्न झाला. पोलिसांनी त्याला २२ जून २०२५ रोजी अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली होंडा युनिकॉर्न मोटारसायकल (किंमत ३०,००० रुपये) आणि अडीच फुटांचा लाकडी दांडा जप्त करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३१०(२) नुसार या गुन्ह्यात कलमवाढ करण्यात आली आहे.
अधिक तपास करत असताना, पोलिसांनी उमेश हारसिंग भोसले (वय २५, रा. डिगी, ता. नेवासा, जि. अहमदनगर) या दुसऱ्या आरोपीला ८ जुलै २०२५ रोजी अटक केली. त्याची पोलीस कोठडी रिमांड घेऊन केलेल्या चौकशीत त्याच्याकडून ४ हजार रुपयांची रोकड (१०० रुपयांच्या १० नोटा आणि ५०० रुपयांच्या ६ नोटा), अडीच फुटांचा लोखंडी पाईप आणि एक लोखंडी कत्ती जप्त करण्यात आली आहे.
या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, पोहेकॉ संजय राठोड, पोहेकॉ सुरज गायकवाड, पोहेकॉ राहुल यादव, पोना सुनील निकम, पोकॉ रवींद्र कांबळे, पोकॉ प्रमोद ढाकणे, पोकॉ नदीम शेख, पोकॉ अंकुश भोसले, पोकॉ सतीश कुऱ्हाडे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. दरोड्याच्या इतर आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.