राहुरी वेब प्रतिनिधी,२४ ( शरद पाचारणे)-
टाळ, मृदंगाच्या गजरात… ज्ञानोबा माऊली.. तुकाराम.. असा जयघोष करत विठुरायाच्या भेटीसाठी श्रीक्षेत्र पंढरपूरला निघालेल्या श्री.क्षेत्र सराला बेट येथील सदगुरु गंगागिरी महाराज पायी दिंडी सोहळ्याचे राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टीस्टेटच्यावतीने आज सोमवारी मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले.
गोदाधाम क्षेत्र सराला बेट येथून महंत रामगिरीजी महाराज यांच्या अधिपत्याखाली जवळपास २ ते २५०० वारकरी पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले आहेत.
राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे महंत रामगिरी महाराज यांच्या समवेत असलेल्या दिंडीचे आगमन होताच फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली. महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी वारकऱ्यांनी जय भवानी, जय शिवाजी जयघोष करत परिसर निनादून सोडला होता.
यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, डॉ.मैथिली सत्यजित तांबे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी भेट दिली. यावेळी बोलताना महंत रामगिरी महाराज म्हणाले की, कपाळे परिवाराने सामाजिक व धार्मिक कार्यात स्वतःला झोकून घेतले आहे.वारकरी सांप्रदायासाठी शिवाजीराव कपाळे व त्यांच्या कुटूंबियांचे नेहमीच योगदान राहिले असल्याचे ते म्हणाले.
सदगुरू गंगागिरी महाराज पालखी पूजा व महंत रामगिरी महाराज यांचे संतपूजन साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे व साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यांत साई आदर्श मल्टीस्टेट व कपाळे परिवाराच्यावतीने हजारो वारकऱ्यांना महाप्रसाद पंगत देण्यात आली.
यावेळी ह.भ प. मधू महाराज,विक्रम महाराज, डॉ. विजय कोते, विष्णुपंत गिते, किशोर थोरात, चंद्रकांत कपाळे, दिपक त्रिभुवन , रमेश ताकटे, पारस नहार, रंगनाथ घाडगे, माजी नगराध्यक्ष ज्योती त्रिभुवन , चैताली कपाळे,उमाताई गीते, अंजली थोरात, कमलताई काळे, श्वेता विजन आदिंसह साई आदर्श मल्टिस्टेटचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.