राहुरी वेब प्रतिनिधी ( शरद पाचारणे ) :- ‘आमच्या मोटरसायकलला कट का मारला’ असे म्हणत चार अज्ञात हल्लेखोरांनी राहुरी येथील ठेकेदार मन्सूरखान मोहम्मदखान पठाण यांना लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी २० जून २०२५ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुरी शहरातील मुलनमाथा येथे राहणारे ठेकेदार मन्सूरखान पठाण हे शुक्रवार, २० जून २०२५ रोजी सायंकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या स्कुटीवरून दत्तनगर येथील किराणा दुकानात सामान घेण्यासाठी गेले होते. किराणा घेऊन ते स्कुटीवरून रात्री आठ वाजण्याच्या सुमारास स्टेशन रोडने घराकडे परत येत असताना पाठीमागून एका मोटरसायकलवर चार अनोळखी इसम आले. अंदाजे १८ ते २० वयोगटातील या चौघांनी तोंडाला रुमाल बांधले होते,त्यातील एकाने “आमच्या मोटरसायकलला कट का मारला” असे म्हणत मन्सूरखान पठाण यांच्या डाव्या खांद्यावर लाकडी दांड्याने मारले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पठाण यांनी आपली स्कुटी सोडून पळण्यास सुरुवात केली. त्यावेळी हल्लेखोरांपैकी एकाने दांडा व दगड त्यांच्या दिशेने फेकले, परंतु ते पठाण यांना लागले नाहीत. या घटनेत पठाण यांच्या खांद्याला मार लागला आहे.
याबाबत मन्सूर खान मोहम्मद खान पठाण यांनी राहुरी पोलीस ठाण्यात चार अज्ञात आरोपींविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.