राहुरी वेब प्रतिनिधी, ७ (शरद पाचारणे ) :- पुणे येथील कसबा पेठेतून निघालेल्या पुणे ते श्रीक्षेत्र शिर्डी पायी दिंडी सोहळा समितीच्या साईबाबा पालखी सोहळ्याचे राहुरी येथे कोरडे परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात येणारी ही पालखी 29 जून रोजी पुण्याहून निघाली असून, यात सुमारे दीड हजार भक्त सहभागी झाले आहेत.
राहुरीतील श्री पंढरी मंगल कार्यालयात पालखीचे आगमन झाल्यावर कोरडे परिवाराने भक्तांचे आणि पालखी सोहळ्याचे आगत्यपूर्वक स्वागत केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
राहुरीचे माजी नगराध्यक्ष कै. बापूसाहेब कोरडे यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या पत्नी श्रीमती जमुनाबाई कोरडे यांनी पालखीतील भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. तसेच, पायी पालखी सोहळ्यातील भक्तांच्या विसाव्याची सोयही कोरडे परिवाराने केली होती.
आषाढी द्वादशी निमित्त मिशन कंपाऊंडच्या विद्यार्थ्यांना स्नेहभोजन
आज, 7 जुलै 2025 रोजी आषाढी द्वादशीच्या शुभमुहूर्तावर, मिशन कंपाऊंड, राहुरी येथील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट स्नेहभोजन देण्यात आले. दरवर्षी श्री साईबाबा पालखीचा महाप्रसाद झाल्यानंतर मिशन कंपाऊंडच्या विद्यार्थ्यांना प्रसाद देण्याची प्रथा आहे. यंदा द्वादशीचा उपवास सोडण्यासाठी या विद्यार्थ्यांना विशेष स्नेहभोजन देण्यात आले.
स्वर्गीय बापूसाहेब पंढरीनाथ कोरडे, माजी नगराध्यक्ष राहुरी, यांच्या स्मरणार्थ श्रीमती जमुनाबाई बापूसाहेब कोरडे यांच्याकडून गेली अनेक वर्षे या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी हा महाप्रसाद दिला जातो. वर्षभरात या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना किमान तीन वेळा स्नेहभोजन दिले जाते. हा नित्यक्रम गेली कित्येक वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे.
श्रीमती जमुनाबाई बापूसाहेब कोरडे यांनी हा नित्यक्रम असाच कायम चालू राहो, अशी इच्छा व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी या स्नेहभोजनाचा मनसोक्त आनंद घेतला. यासाठी वसतिगृहाचे श्री. शिरसाट सर आणि श्रीमती शिरसाट मॅडम यांनी अनमोल सहकार्य केले.