राहुरी वेब प्रतिनिधी,(शरद पाचारणे ):- डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कारवाडी (मालुंजे खुर्द) येथे आज माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या उपस्थितीत १०१ रोपांचे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले.
माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे आरोग्य शिबिर श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट संचलित आयुर्वेद महाविद्यालय, श्री शिवाजीनगर व फार्मसी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात विद्यार्थ्यांची **रक्तगट तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी** तसेच इतर आरोग्याच्या समस्यांची तपासणी करण्यात आली. आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. चोखर, डॉ. तुपे, डॉ. विलास कड आणि अन्य वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे, फार्मसी कॉलेजने कारवाडी विद्यालय पुढील पाच वर्षांसाठी विद्यार्थ्यांचे आरोग्य व्याख्यान आणि औषध सहकार्यासाठी दत्तक घेतले आहे.
याप्रसंगी विद्यालयात बकुळ, सप्तपर्णी, साग, अशोका अशा विविध प्रकारच्या १०१ वृक्षांचे वृक्षारोपण माजी खासदार प्रसाद तनपुरे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार संजय कुलकर्णी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. भाऊसाहेब पाटील लोखंडे, माहेगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. स्वाती कवडे, श्री. तुकाराम अण्णा थेवरकर, डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर माऊली पवार, बबनराव बोरुडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष उद्धवराव थेवरकर, नारायण रिंगे, भगीरथ पवार, राजेंद्र बोरुडे, चांगदेव देठे, डॉ. सर्जेराव सोळुंके, साईनाथ लोखंडे, माजी मुख्याध्यापक अण्णासाहेब खाडे, सेवानिवृत्त शिक्षक बाळासाहेब बोंबले, किशोर पवार, सुनील गोसावी यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री. प्रदीप तनपुरे यांनी केले. त्यांनी विद्यालयातील विविध नवोपक्रमांची माहिती यावेळी दिली. याप्रसंगी विद्यार्थिनी कु. प्रगती म्हस्के, प्रगती पवार, सविता दळवी, ईश्वरी पवार, मयुरी लोखंडे, सविता शेळके यांनी संस्थेचे अध्यक्ष प्रसाद तनपुरे यांना वाढदिवसानिमित्त मोगऱ्याचे रोप देऊन शुभेच्छा दिल्या.
माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी यावेळी वृक्षांचे महत्त्व, आरोग्याची गरज आणि भविष्यातील त्यांची आवश्यकता** यावर अनमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.