नायगाव,१६ (वेब टिम ):- महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री,मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव येथे जनसेवा मंडळ, नायगाव यांच्या वतीने विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय, नायगाव (ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) येथे पार पडलेल्या या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. दीपक अण्णा पठारे पा. (मा. सभापती, पंचायत समिती श्रीरामपूर) यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. बाळकृष्ण भोसले पा. हे होते, तर नायगाव गावचे सरपंच डॉ. रा.ना. राशिनकर साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवण्यात आले. त्यांना मोफत शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले. पर्यावरणाची जपवणूक करण्याच्या दृष्टीने परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच, उपस्थित नागरिकांसाठी मोफत रक्तगट तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते, ज्याचा अनेकांनी लाभ घेतला.
यावेळी बोलताना दीपक अण्णा पठारे यांनी आपल्या मनोगतात मा. विखे पाटील साहेबांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, “साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी केवळ पदासाठी नाही, तर गावागावांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी काम करत आहे. त्यांच्या प्रेरणेने शैक्षणिक सुविधा, डिजिटल साधने आणि विद्यार्थ्यांना आधार देण्याचे अनेक उपक्रम हाती घेतले.”
मा. नामदार विखे पाटील साहेब यांनी राज्यभरात जलसंधारणाच्या मोठ्या योजना राबवून ग्रामीण भागातील शेती आणि पाणी प्रश्नांवर दूरदृष्टीने काम केले आहे. त्यांच्या पुढाकाराने राबवण्यात आलेली जलसंधारण कामे आज महाराष्ट्राच्या विकासाच्या नकाशावर ठळक ठसा उमटवत आहेत आणि या योजनांचा लाभ लवकरच जनतेला मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. कोविडसारख्या संकटाच्या काळातही साहेबांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत गरजूंना अन्न, औषधे आणि वैद्यकीय मदत वेळेवर पोहोचवली. त्यांचे कार्य केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून, ते माणुसकीच्या सेवेचा एक आदर्श आहे, असेही पठारे यांनी नमूद केले.
या अभिमानास्पद उपक्रमाचे सुंदर आयोजन श्री. सुभाष लांडे पाटील, ॲड. प्रशांत राशिनकर, आणि श्री. ज्ञानेश्वर लांडे पाटील यांनी केले होते. साहेबांवरील त्यांचे प्रेम आणि आदर या उपक्रमातून ठळकपणे दिसून आला.स्व. बाळासाहेब लांडे पा. मित्र मंडळाचे देखील या उपक्रमात विशेष योगदान राहिले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. लबडे सर यांनी देखील मोलाचे सहकार्य केले.
यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष सुनील लांडे, गावचे ज्येष्ठ नेते भानुदास लांडे, विद्यमान संचालक उत्तम राशीनकर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेन लांडे, सुनील दातीर, शैलेश खाटेकर, शिवाजी नळे, संजय ढवळे, दत्ता नवले, दीपक कैलासराव राशिनकर यांच्यासह गावातील अनेक मान्यवर, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे कार्यक्रमाची शोभा द्विगुणित झाली.
हा उपक्रम सामाजिक जाणीवेची जिवंत साक्ष देणारा असून, कर्तृत्व, कृतिशीलता आणि कृतीशील नेतृत्वाचा हा सन्मान नायगाव ग्रामस्थांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारा ठरला आहे.